भोर : प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहीते यांच्यासह एका जणावर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध राजगड पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रहार जनशक्ती भोरचे अध्यक्ष संतोष मोहीते यांनी राजेंद्र पालखे यांच्या मुलाला ‘तु अवैध प्रवासी वाहतूक करतो’. प्रवासी वाहतूकीची गाडी चालवायची असेल, तर तुला मला पैसे दयावे लागतील. त्यानंतर पालखे यांच्या मुलाकडे पैशासाठी तगादा लावून त्याच्याकडून दहा हजार रूपये खंडणी घेतली.
राजेंद्र पालखे यांच्या गावातील बचत गटाची महिला जयश्री गोरक्ष थिटे यांच्या सांगण्यावरून पालखे हे मोहिते यांच्या किकवी येथील ऑफिसला गेले असता त्या दोघांनी धमकावले. संतोष मोहिते यांनी बचत गटाच्या व्यवहारापोटी तो तडजोड करतो, असे सांगून त्यासाठी पैशाची मागणी पालखेंकडे केली. त्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने मुलास कृष्णत राजेंद्र पालखे (वय 30 वर्षे) यास पैशासाठी जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचे अपहरण केले, असे फिर्यादीत नमूद केले
असून याप्रकरणी संतोष मोहिते व जयश्री गोरक्ष थिटे (रा. भोंगवली, ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत राजेंद्र लक्ष्मण पालखे (वय 54 वर्षे, रा. हातवे बु।।, ता. भोर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष मोहिते यास कोर्टात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.