भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रुपाली रुपेश जाधव यांची सोमवार (दि.११) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बाजारवाडी गावच्या विद्यमान सरपंच सीता मोहन गुरव यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता.
सरपंचपद रिक्त झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल धर्माकांबळे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान सरपंच पदासाठी रुपाली रुपेश जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी धर्माकांबळे यांनी सरपंचपदी रुपाली रुपेश जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मावळत्या सरपंच सीता गुरव, उपसरपंच उत्तम खोपडे, सदस्य मोहन मानकर, ग्रामसेवक रणजित ननावरे, कोतवाल उषा मानकर, ग्रामपंचायत कर्मचारी गोविंद खोपडे,उषा मानकर, पोलीस पाटील अर्जून शिंदे आदि उपस्थित होते.
रुपाली जाधव यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल मावळत्या सरपंच सीता गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात जाऊन गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख मानकर, संजय मानकर, भीमराव कांबळे, मोहन गुरव, संतोष जाधव, मंगेश खोपडे, मारुती चव्हाण, आनंद गायकवाड, सुदाम राऊत, बबन खोपडे, तसेच कविता सपकाळ, मनीषा सपकाळ, सीताबाई कांबळे, नंदाबई कांबळे, रंजना कांबळे, सुनीता कांबळे, रेखा यादव, कल्पना यादव, रेखा जाधव, मुक्ताबाई जाधव, वर्षा गायकवाड, सिंधुताई सपकाळ, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच रुपाली जाधव यांनी बाजारवाडी गावच्या विकासासाठी आ. संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य तसेच प्रशास नाच्या सहकार्याने शासनस्तरावरील विविध योजना कार्यक्षमतेने राबविल्या जातील असे सांगितले.