भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
अतिक्रमण झालेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास
भोर नगरपरिषदेने आपल्या हद्दीतील बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणावर गुरुवार (दि३०) हातोडा चालवत कारवाई करण्यात आली.
भोर शहरात वाहतूक रस्ता अडथळे, वाढणारी गर्दी समस्या , वाहतूक कोंडी, रस्त्यावर होणारी दुकानदारी, अतिक्रमण अशा अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत होता. त्यामुळे भोर नगरपरिषदेने एसटी बस स्थानक ते नगरपालिका चौक व राजवाडा तहसीलदार कार्यालय रस्त्यावरील दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी लोकांना अतिक्रमणाबाबत वारंवार लेखी, तोंडी नोटीसा बजावल्या होत्या. तसेच दोन आठवड्यापूर्वी नगरपालिका बाजारपेठ मुख्य रस्ता व राजवाडा , तहसीलदार कार्यालय रस्ता यावर पिवळा पट्टा रेषा अधोरेखित (लाईन आऊट)करून रस्ता हद्द कायम केली होती. या हद्दीतील असणारी अतिक्रमण बांधकामाबाबत लोकांना २४ तासाच्या आत अतिक्रमण बांधकामे हटवण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या परंतु या नोटीसधारक लोकांनी कोणतीच हालचाल न करता या नोटीसबाबत टाळा टाळ केली होती. त्यामुळे अखेर शेवटी नगरपालिकेने कडक कारवाई करत गुरुवारी बस स्थानक बाजारपेठ मुख्य रस्ता , राजवाडा चौक रस्त्यावरील अतिक्रमणांवर जे सी बी फिरवत हातोडा चालविला. सदरची कारवाई महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ ते ५५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदर होणाऱ्या अतिक्रमणाच्या कारवाईत होणा-या नुकसानीस अतिक्रमण न हटवल्यामुळे स्वतः नोटीस धारक जबाबदार राहणार आहेत असे नोटीसी द्वारे नगरपरिषदेकडून सांगण्यात आले आहे. या अतिक्रमणाच्या कारवाई वेळी भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत किरूळकर , नगरपालिकेतील इतर पदाधिकारी , कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजकीय वरदहस्त लाभलेल्या शहरातील जागोजागच्या अनधिकृत टप-या नगरप्रशासन अशाच हटविणार का?असा प्रश्न शहरातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.