राजगड न्युज नेटवर्क
शिरूर : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या अनुपस्थितीत पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा दर्शन घेतल्यानंतर सत्कार करण्यात आला.मात्र हा सत्कार गावातील काही नेत्यांना ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच महागात पडला असून रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला हेलपाटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
शिरुर तालुक्यातील काही गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर साम, दाम, दंड, भेदाने मतदारांना आजमावन्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे.त्यातच सध्या रांजणगाव ग्रामपंचायतचीही निवडणुक प्रक्रिया सुरु असून कुख्यात गुंड गजा मारणेचा रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात पाचही विश्वस्तांच्या अनुपस्थितीत सत्कार करणे, त्याचे फोटो काढणे, तसेच त्याच्याबरोबर चालण्याचे व्हिडिओ काढणे आणि जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करणे यापाठीमागे मतदारांमध्ये दहशत पसरविण्याचा तर हेतू तर नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा मात्र रंगली आहे.
त्यातच ही खबर पोलिसांना कळताच पोलिसांनी या राजकीय नेत्यांना चांगलेच फैलावर घेतल्याने “नको तो गजा आणि नको तो बेंडबाजा” अशी या नेत्यांची परिस्थिती झाली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या सर्व राजकीय नेत्यांना पोलिस ठाण्यात चौकशीला बोलावून खरडपट्टी काढली.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गावात आणून दहशत निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.
– पोलिस निरीक्षक महेश ढवाण
मंदिरातील दानपेटी मोजण्याचे काम सुरू असल्यामुळे मी सत्काराच्या ठिकाणी उपस्थित नव्हतो.
– ओंकार देव (मुख्य विश्वस्त, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट)