बाळु शिंदे:राजगड न्युज
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर हायवे लगत असलेल्या कामथडी (ता.भोर) येथे स्नँक सेंटरच्या दहा दुकान गाळ्यांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला असून घटना सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद झाली आहे .या घटनेची नोंद राजगड पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
कामथडी (ता.भोर) येथे असलेल्या फूड मॉल दुकानाचे दहा गाळे असून स्नँक सेंटरसाठी ते भाड्याने दिले आहेत. ६ आक्टोंबरच्या रात्री काही अज्ञात चोरट्यांनी यासर्व दहा गाळ्यांचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आत काहीच न मिळाल्याने दुकानांमधील साहित्य चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकून दिले. त्यामुळे साहित्याचे नुकसान झाले आहे.या बाबत गाळा मालक अजय गणेश जाधव (वय २६, रा. केळवडे ता.भोर) यांनी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवावी
महामार्गावर अशा पद्धतीने चोऱ्या होऊ लागल्यास व्यावसायिकांना व्यवसाय करणे अवघड होणार आहे. अनेक व्यावसायिकांनी हॉटेलसमोर सुरक्षारक्षक नेमले असून काही छोट्या दुकानदारांना सुरक्षारक्षक नेमणे शक्य होणार नाही. यासाठी महामार्गावर रात्री एक-दोननंतर पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी छोट्या व्यावसायिकांनी केली आहे.
या दहा दुकानांच्या चोरीच्या प्रयत्नाबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले जात असून लवकरच या चोरट्यांना पायबंद घातला जाईल, – पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप