मुंबईः ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही पक्षातील काही नेत्यांनी सभास्थळाला भेट देत समारंभाची पाहणी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार तसेच शपथ घेणाऱ्या मंत्र्याची नावे यावेळी सांगण्यात आली नाही. यामुळे आता ५ डिसेंबर रोजी जरी शपथविधी सोहळा होत असला तरी मंत्र्याच्या नावांची अधिकृत कोणतीही घोषणा कोणत्याही नेत्यांनी यावेळी केली नसल्याने आता शेवटच्या क्षणापर्यंत ही नावे गुलदस्त्याच असणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
या सभास्थळाची पाहणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाठ, हसन मुश्रीम, अनिल पाटील, गुलाबराव पाटील, धनंजय मुंडे, प्रवीण दरेकर या नेत्यांनी केली आहे. पाहणी केल्यानंतर माध्यामांसोबत बोलताना कोणत्याही नेत्याने मंत्र्यांची नावाची माहिती यावेळी दिली नाही. केवळ बावनकुळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शपथविधी सोहळा होणार असून, इतर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदार खासदार उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी बावनकुळे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार असा प्रश्न विचारताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला वा या प्रश्नावर उत्तर देणे टाळले. यामुळे आता महायुतीमधील मंत्र्यांची नावांची यादी जरी माध्यमांमध्ये दाखविण्यात येत असली तरी ज्यावेळी आमदारांपैकीर कोण मंत्री पदाची शपथ घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.