भिगवणः येथे मित्रासोबत झालेल्या भांडणातून संतापलेल्या मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घूणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे येथे खळबळ उडाली आहे. विजयकुमार विठ्ठलराव काजवे असे वय ४५ राहणार निरगुडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मदनवाडी येथील गायरान माळरानावर मयत व्यक्ती विजयकुमार काजवे आणि त्याचा मित्र राज शिंदे यांच्यात कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. या भांडणाचा राग अनावर झाल्याने राज याने विजयकुमार यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत विजकुमार यांचा जागीच मृत्यू झाला असून, आरोपी राज भगवान शिंदे वय २० राहणार मदनवाडी यांस पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत.