पारगांवः धनाजी ताकवणे
शुक्रवारी १४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या IX613 या विमानात अचानक बिघाड झाला. यामुळे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वैमानिकांची तारेवरची कसरत सुरू झाली. जमिनीपासून तब्बल ३६ हजार फूट उंचीवर हि घटना घडली होती. परंतु, अशा बिकट परिस्थितीत घाबरुन न जाता मुख्य वैमानिक इक्रम रिफाडली, फहमी झैनल आणि सहवैमानिक मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे यांनी धीराने विमानातील बिघाड दुरूस्त केला. तसेच सदर विमान हे तमिळनाडूच्या त्रिची विमानतळावर सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले.
यामुळे विमानातील सर्व १४० प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. वेळीच प्रसंगाअवधान दाखविल्याने पुढे घडणार मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये सहवैमानिक असलेली तालुक्यातील मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे हिने आपल्या चाणक्ष्य बुद्धीने, रणरागिणी प्रमाणे समोर आलेले आव्हान लिलया पार केले. याबद्दल तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच तिचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे नागरिक सांगत आहे. दौंड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे बोलले जात आहे.