हवेली पोलीस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
हवेली : पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आलयची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्यासह इतर कार्यवाही सुरू आहे.
खडकवासला धरणावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चौपाटीजवळ धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचे बॉक्स फेकलेले असल्याचे दिसून आले.काही बॉक्स पाण्याजवळ तर काही औषधांच्या बाटल्या थेट पाण्यात फेकण्यात आलेल्या होत्या. यामध्ये इंजेक्शन, लहानमोठ्या भरलेल्या औषधांच्या बाटल्या व इतर साहित्य दिसून येत आहे. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत हवेली पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात पडलेल्या औषधांच्या बाटल्या बाहेर काढून घेतल्या असून घटनास्थळी काचांचा खच दिसून येत आहे.दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा थेट पाण्यात आढळून आल्याने खडकवासला धरणासह पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलीस अधिकाऱ्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
‘तुम्ही हे फोटो, व्हिडिओ काढले ते कोठेही शेअर करायचे नाहीत, तुम्हाला नीट सांगतोय’, असे म्हणत उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा गांभीर्याने तपास करुन संबंधित समाजकंटकाचा शोध घेणार की केवळ कागदी घोडे नाचविले जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.