तरडगाव: प्रतिनिधी नवनाथ गोरेकर (रियालिटी चेक)
देशात महाराष्ट्र राज्य हे ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य आहे. येथील शेतकऱ्यांची ऊस उत्पादनातून प्रगती होऊन तो सुखावला जावा तसेच देशात साखर उद्योगाला संशोधनातून बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या महाराष्ट्रातील पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राची अवस्था दयनीय झाली आहे. या केंद्रामध्ये अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि चांगला उतारा देणाऱ्या ऊसाच्या नवीन जाती निर्माण करणे आणि त्यांचा प्रसार करणे हे महत्त्वाचे काम केले जाते. मात्र, गेली कित्येक वर्ष या केंद्राची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने संशोधनाच्या कामाला खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
संशोधन केंद्रासाठी जवळपास ३०० कर्मचारी संख्या मंजूर असून, देखील प्रत्यक्षात मात्र अनेक पदे भरलेली नाहीत. एकूण १७० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. एका कर्मचाऱ्याला दोन ते तीन विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. अतिरिक्त कामामुळे कोणतेही काम सुरळीत होत नसल्याची खंत कर्मचारी वर्गात आहे. केंद्राच्या आवारात असलेले ब्रिटिशकालीन कर्मचारी निवासस्थानाची देखील जीर्ण झाली आहेत. कर्मचारी संख्या जास्त नसल्याने निवासस्थाने जवळपास ९५ पेक्षा जास्त मोकळी पडली असून त्याची अवस्था देखील दयनीय आहे. नवीन इमारतीस निधी उपलब्ध व्हावा, अशी कर्मचारी वर्गाची अनेक वर्षांपासूनची इच्छा सरकार पूर्ण करेल अशी आशा कर्मचारी वर्गात आहे.
संशोधन केंद्राची इमारत ही ब्रिटिशकालीन असून ९० वर्षी जुनी झाली आहे. प्रशासकीय इमारत पावसाळ्यात गळत असल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही इमारती नवीन बांधून संशोधन केंद्राचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. मात्र शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
शेतकरी निवास स्थानाची गरज
संशोधन केंद्राला दिवसभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी भेट देत असतात. भेटीसाठी येणाऱ्या शेतकऱ्याना अद्ययावत प्रशिक्षण केंद्र त्याच बरोबर शेतकरी निवास स्थानाची गरज आहे. देशभरात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभर १७ संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. हे केंद्र त्यापैकी एक असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अंतर्गत कार्यरत असणारे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा येथे १९३२ मध्ये स्थापन करण्यात आले.
साखर कारखाने भरभराटीस आणण्यास योगदान
देशात एकूण ऊस लागवड क्षेत्रापैकी ५६% क्षेत्रात पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची ऊस वाण वापरले जाते. तर महाराष्ट्रात एकूण लगवडीपैकी ८६% क्षेत्रात पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधन केलेली वाण वापरली जातात. महाराष्ट्रातील नव्हे, तर देशातील साखर कारखाने हे एकमेव पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने भरभराटीस आणलेली आहेत. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने दिलेल्या वाणमुळे ऊस उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी साखर कारखाने भरभराटीस आले आहेत. संशोधन केंद्राने लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, आंतरपिके, पाणी व व्यवस्थापन, ठिबक व तुषारसिंचन पद्धती, तण व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जैविक खते, माती, पाणी व रसायनशास्त्र अशा अनेक महत्त्वाच्या बाबींसंबंधी मोलाचे संशोधन करून कृषी संशोधन क्षेत्रात दबदबा कायम ठेवत कित्येक वर्ष शेतकऱ्यांचा मनावर अधिराज्य केले. आणि संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवला.
नव्या साहित्याच्या मागणीला केराची टोपली
संशोधन केंद्रातील ब्रिटिशकालीन प्रयोगशाळा ह्या जीर्ण झाल्या आहेत. संशोधन करण्यातही लागणारी आधुनिक उपकरणे, साहित्य इत्यादी गोष्टींची कमतरता असल्यामुळे संशोधन करताना शास्त्रज्ञांना अडचणी निर्माण होत आहे. नवीन साहित्य खरेदीसाठी कित्येक वर्षांपासून निधी नसल्यामुळे शास्त्रज्ञ देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. विविध विभागात काम करत असणारे संशोधन शास्त्रज्ञ उपलब्ध नसल्याने प्रयोगशाळा देखील धूळ खात पडल्या आहेत. काही उपकरणे देखील वापराविना निष्क्रिय झाली असतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
शासनाने लक्ष देणे गरजेचे
संशोधन केंद्राची संशोधन परंपरा की गौरवशाली राहिली आहे. या संशोधन केंद्रात काम करणारे संशोधक पुढे जाऊन कुलगुरू देखील झाले होते. मात्र, याच संशोधन केंद्राकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने केंद्राच्या संशोधनाच्या कार्यक्षमतेलाच कीड लागली आहे असे शेतकरी वर्गामध्ये भावना तयार झाली आहे. देशातील ऊस संशोधनात अग्रेसर असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला शासनाने भरीव निधी देऊन केंद्राला बळकटी द्यावी. रिक्त जागा भरून संशोधनाला गती द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ऊस रोपवाटिका मध्ये गवताचे साम्राज्य
संशोधन केंद्रातील ऊस रोपवाटिकामध्ये ऊसाची रोपे नसून गवतच उगवलेले दिसत आहे. रोपांची संख्या कमी असल्याने रोपवाटिका मोकळ्या पडल्या असून बऱ्याच वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत.
अनेक वर्षापासून पदभरती नाहीच
मंजूर असलेल्या कर्मचारी संख्येपेक्षा पन्नास टक्के सुद्धा उपलब्ध नाहीत. लवकरात लवकर पदभरती करून शेतकऱ्याना ऊसाचे नवनवीन वान उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
रस्त्याअभावी आडसाली बेणे देण्यात अपयशी
संशोधन केंद्राच्या शेतातील रस्ते पक्के नसल्यामुळे बेणे वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आडसाली बेणे शेतकऱ्यांना देण्यात गैरसोय होत आहे. तरी निधी उपलब्ध झाल्यास रस्ते दुरुस्ती करून आडसाली बेणे देण्यात केंद्राला शक्य होईल.