बारामती : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली. नणंद-भावजयी एकमेकींच्या विरोधात उभ्या होत्या. निवडणूकीमध्ये नणंद भावजयीच्या वरचढ ठरली आहे.सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केले आहे.
राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती. शरद पवार आणि अजित पवार, एकाच घरातील दोन सदस्यांमध्ये झालेली ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्यासोबत भावनिकरित्या जोडलेले आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या. नणंद-भावजय, मुलगी-सून, राष्ट्रवादीचे दोन गट तसंच महाआघाडी आणि महायुती अशी ही लढत. त्यामुळे या लढतीकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. या लढतीत सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे यांना 226084 मतं मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांना 203479 मतं मिळाली आहेत.
सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांबाबत बोलताना भावुक झाल्या होत्या. माझी लढाई ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाहीये, मी कोणावरही व्यक्तीगत टीका केलेली नाही. माझी लढाई ही बेरोजगारी, दडपशाही विरोधात असणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांनी आमच्या आईला निवडणुकीत उतरवलं, आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना निवडणूक लढवावी लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.