भोर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेली स्वागत कमान बेकायशीर ठरवत ग्रामपंचायतीने पाडल्याच्या निषेधार्थ सांगलीतील बेडग गावातील आंबेडकरी समाज मुंबईकडे रवाना झाला आहे. यामध्ये चिमुकल्यांसह वयोवृद्ध महिला देखील सहभागी झाल्या आहेत. आज हा लॉंग मार्च पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे. सारोळा या ठिकाणी भोर तालुक्यातील आंबेडकर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांचे स्वागत करत, त्यांना समर्थन जाहीर केले.
सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग येथे दलित समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान उभारण्यात येत होती. बेडग ग्रामपंचायतीने कमान बांधण्यासाठी परवानगी देखील दिली होती. मात्र, १६ जून रोजी कमान बेकादेशीर असल्याचे ठरवत, ग्रामपंचायतीने बांधकाम सुरू असलेली कमान पाडून टाकली. यानंतर जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमींनी याला विरोध केला. (Bhor News) त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत विरुद्ध दलित समाज असा संघर्ष सुरू झाला. याच कारणास्तव बेडग येथील दलित समाजाने गाव सोडण्याचा निर्धार केला. घरांना कुलूप लावत, बॅगा भरुन सुमारे दीडशेहून अधिक कुटुंब या मार्चमध्ये सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने निघाली आहेत.