जेजुरीः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुरंदरमध्ये खूप मोठे राजकीय घमासान पाहिला मिळत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे दिसत असले तरी ४ नोव्हेंबरला यावर स्पष्टता मिळेल. पुरंदरकरांच्या मनात काहीशी संभ्रवस्था निर्माण झाली आहे. मतदारांच्या मनातील प्रतिक्रिया संमिश्र येत असल्याने उमदेवारांनी निवडून येणार अशी दावेदारी केली असली तरी मतदारराजा कोणाच्या पारड्यात मतदानरूपी मतांचे दान टाकतो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अनेक नेत्यांनी पुरंदरकरांना अनेक आश्वासने दिलेली आहे. त्यापैकी किती पूर्वत्वास गेली हा खरा प्रश्न आहे. पुरंदर उपसा सिंचन योजना ही ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुरंदरकरांच्या माथी मारली. त्याची अवस्था दयनीय आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार हे एकच वाक्य नेते मंडळी गिरवताना दिसत आहेत. यामुळे इथल्या जनतेच्या मनात नाराजीचा सूर आहे.
तालुक्यात कोणतेही मोठे कॅालेज नाही
तालुक्यात सासवडमध्ये वाघीरे विद्यालय वगळता कोणतेही भव्य दिव्य पद्धतीचे महाविद्यालय येथे नाही. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास बारामती येथे टीसी कॅालेज आणि व्हिपी कॅालेज आहेत. तशा प्रकारचे कॅालेज या ठिकाणी नाही. आजवर अनेकांनी आश्वसने दिली, ती निवडणुकीपुरतीच. यामुळे इथल्या मुलांना शिक्षणासाठी पुण्याची कास धरावी लागत आहे. इथले बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात वा इतरत्र जात आहेत. त्या ठिकाणचा खर्च आवाच्या सव्वा असल्याने शिक्षणासाठी मोठा भुर्देंड विद्यार्थ्यांच्या पालकांना सोसावा लागत आहे. सध्याच्या घडीला केवळ इंजिनिअरिंग, आर्टस, कार्मस वा सायन्स याहीपेक्षा अनेक प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. तशा प्रकारचे व्होकेश्मल कोर्सस येथे नाहीत.
शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न
पुरंदर तालुक्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळांची शेती केली जाते. या शेतीसाठी वा इतर प्रकारच्या शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये पुरंदर तालुक्याचा देखील समावेश करण्यात आला होता. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पैसे देऊन पिण्यासाठी पाणी घ्यायची वेळ आली होती. तर शेतकऱ्यांना शेतीसाठी देखील टँकरने पाणी देण्याची वेळ आली होती. वीज पुरवठा सातत्याने खंडीत होणे ही एक मोठी समस्या या भागातील नागरिकांना भेडसावत आहे.
संमिश्र प्रतिक्रिया
यामुळे तुमच्या मनातला आमदार कोण? असे विचारल्यावर अनेकजण आमच्या मनातला आमदार तुम्हाला का सांगायचा असा प्रतिप्रश्न करीत आहेत. राजकारणाबद्दल अनेकांची मते फारशी समाधानकारक नाही. यामुळे रिंगणात असलेल्या कोण्या एकाला सर्वाधिक पसंती मिळत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. मतदारांची मते ही संमिश्र स्वरुपात येत आहेत. जनता सध्या विचार करीत आहे, ते आपले मतदान करून मतदानाचा हक्क जरूर बजावतील पण ते मतदान कोणाच्या पारड्यात अधिक पडेल, यासाठी २३ नोव्हेंबरजी सकाळ उजडावी लागेल.