खंडाळाः शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांची जनसंवाद यात्रा तालुक्यातील भादे येथे आली. त्यावेळी जाधव यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, तालुक्यातील लोणंद, फलटण, बारामती या चौपदरीकरणाच्या रस्त्यासाठी गुंठ्याला पंचवीस हजार रुपये दर देऊन गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अक्षरशः लुबाडल्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याविरुद्ध मी स्वतः आंदोलन करून रस्त्याचे काम बंद पाडले आणि उर्वरित शेतकऱ्यांना प्रति गुंठा अडीच लाख रुपये दर मिळवून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, भादे गण पंचायत समिती सदस्या शोभा जाधव, वाई विधानसभा संघटक संजयसिंह देशमुख, खंडाळा तालुका संघटक सचिन आवारे, भूषण शिंदे खंडाळा तालुका अध्यक्ष ,सचिन धायगुडे, सागर ढमाळ खंडाळा तालुका उपाध्यक्ष ,मंगेश खंडागळे माजी शहरप्रमुख खंडाळा शहर ,भानुदास जाधव खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना ग्रामपंचायत भादे बेबीताई कुंभार सदस्या, ग्रामपंचायत भादे, शांताराम चव्हाण चेअरमन, श्री भैरवनाथ विकास सेवा सहकारी सोसायटी भादे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पाटील’कीचे खरे रुप जनतेसमोर आणणार
मी स्वतः पैसे खर्च करून उच्च न्यायालयामध्ये याचिका सादर करून गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. अजूनही हा लढा संपलेला नाही. वाई-खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात गावोगावी गटागटात घराघरात भांडण लावून कार्यकर्ते संपवण्याचे उद्योग विद्यमान आमदारात करित असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या १५-२० वर्षात हे काम चालविले असून, सत्तेची मस्ती उतरवण्यासाठी आता जनता पेटून उठली आहे. खोट्या जननायकाचा बुरखा आता आम्ही सगळे मिळून टरा-टरा फाडू आणि ‘पाटील’की चे खरे रूप जनतेसमोर आणू असा इशारा पुरुषोत्तम जाधव यांनी विद्यामान आमदारांना भादे येथील जनसंवाद मेळाव्यात दिला आहे.
विकासासाठी साथ द्या
जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील मूलभूत प्रश्न अजूनही प्रलंबित असून ३ उपसा जलसिंचन योजना आमच्याच तालुक्यात असूनही आम्हाला पाणी मिळू शकत नाही. रस्ता भूसंपादनाचा विषय देखील विद्यमान आमदार सोडवू शकले नाहीत, मी स्वतः यासाठी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी राहिलो आहे. यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी साथ द्या असे आवाहन जाधव यांनी केले.