बारामती : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
बारामतीत कोणताही उमेदवार उभा न करता खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे वतीने घेण्यात आला आहे. बारामतीत वंचित बहुजन आघाडीची ताकद या निर्णयामुळे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबत उभी राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी सोबत प्रकाश आंबेडकर यांनी यावे यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश न आल्याने वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली होती.
बारामतीत वंचित बहुजन आघाडी काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता होती, मात्र प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत उमेदवार उभा न करता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची ताकद या निवडणुकीत राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.