कलानगरीः पुष्पा सिनेमातील दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणामध्ये अल्लू यास अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान, थिएटरबाहेर झालेल्या गर्दीत एका 35 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी प्रेक्षक जमले होते. त्यावेळी उसळलेल्या गर्दीत या महिलेचा जीव गेला होता. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे हैद्राबाद पोलिसांनी सांगितले आहे.
हैद्राबादमधील चिक्कामुली पोलीस स्टेशनमध्ये अल्लु अर्जुनला नेण्यात आले असून त्या ठिकाणी त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे समजते. महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी संध्या थिएटरचे मालक मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. तसेच अल्लु यांच्या खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.