भोर : तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात शेतीची कामे उरकली आहेत. बहुतांशी गावच्या यात्रा, जत्रा झाल्या आहेत,तसेच होळीच्या सणानंतर उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने ग्रामीण भागात महिलांची उन्हाळी वाळवणाच्या पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली असून घराघरात पापड्या, कुरड्या, शेवया, खारवड्या हे उन्हाळी पदार्थ तयार करण्यास सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच शेतात पिकलेल्या धान्यापासून तांदूळ , ज्वारी,बाजरी ,गहू या धान्यांपासून म्हणजे गव्हापासून शेवया कुरडई , बाजरीच्या खारवड्या,पापड्या, तांदळापासून पापड्या, उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स चकल्या, साबुदाणा चिप्स,चकल्या आदी वाळवून ठेवण्याचे पदार्थ तयार करण्याची लगबग महिलांची सुरू झाली आहे.
खारवड्या,बटाटा चिप्स,पापड्या,पापड शेवया खारवडे, कुरडया, चिकोड्या, तयार करण्यासाठी गावातील महिला एकत्र येतात. प्रत्येक महिला आपल्या शेजारणीकडे हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी आनंदाने जातात.पापड, सांडगी, कुरड्या, चिकोड्या तयार करुन वाड्यांमधले चौक, घरांच्या अंगणात, पडवीत, छतावर, कौलावर किंवा पत्र्यावर वाळविले जातात.
दाराशी हातात काठी घेऊन वाळवणं राखणारी एखादी आजीबाई हे चित्र पहावयास मिळते. हे पदार्थ बनवितांना गप्पां गोष्टी, पारंपरिक गीते गायली जातात. चारचौघींनी एकत्र येऊन केल्या जाणाऱ्या या वाळवणांच्या दिवसांत चवीच्या रंगढंगानुसार गृहिणींची सुखदुःख तसेच लग्नातल्या रुखवतामध्ये रंग भरले जातात. घरातील लहान थोर मदत करतात. तयार केलेले पदार्थ नातेवाईक,शेजाऱ्यांना आवर्जुन चवीसाठी दिले जातात. ही परंपरा व संस्कृती अजूनही टिकून असल्याचे पाहायला मिळते.
होळीचा सण झाल्यावर उन्हाळी कामास सुरुवात होते. या कामासाठी अनेक महिलांची गरज असल्याने आळीतील महिला एकत्र येवून वारंगुळ्याने (आळीपाळी किंवा आलटून पालटून, एकमेकांचे काम सहकार्याने करण्याची महिलांची पद्धती) पदार्थ आळीपाळीने बनवितात.
पापड, कुरडया, शेवया, सांडगे यांसारखे पदार्थ बनवून, उन्हात वाळवून वर्षभराची साठवणूक केली जाते. या काळात हवेत आद्रता नसल्याने तयार केलेले पदार्थ सादळत नाहीत. ते वर्ष भर टिकतात, त्यामळे ग्रामीण भागात महिला वर्ग आवर्जुन हे पदार्थ उन्हाळ्यात बनवितात.-यशोदा लक्ष्मण शेटे, गृहिणी, उत्रौली (ता.भोर)
नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना हे पदार्थ घरी बनवणे शक्य नसल्याने वाफेवरच्या सालपापडया, सांडगे,कुरडर्ई, पापड,शेवया पदार्थांना शहरात मोठी मागणी असते. आम्ही आमच्या दुर्गा शक्ति महिला बचत गटांच्या मार्फत हे पदार्थ तयार करुन शहरात माॅल,बाजारपेठात विक्रीला पाठवितो.तयार केलेल्या पदार्थ हातोहात खपतात. बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जास्त मागणी असते. आगाऊ रक्कम ग्राहक देत हव्या ते पदार्थ तसेच रुखवतावरील रंगीबेरंगी पदार्थ आवर्जून बनवून घेतात.- योगिता पोळ, सचिव, दुर्गा शक्ति महिला बचत गट, पोळवाडी (ता.भोर)