नसरापूर : नवसह्याद्री गुरुकुल व ज्युनिअर कॉलेज नायगाव येथे दिनांक 7 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ माता पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या विश्वस्त सुनंदाताई सुके, संस्थेच्या उपाध्यक्षा सायलीताई सुके , नवसह्याद्री गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य किरण पवार सर यांच्या सह विद्यालयातील सर्व मातापालक , माध्यमिक वर्गाच्या सर्व विद्यार्थिनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. या वेळी सर्व माता पालकांचा शुभेच्छा पत्र देऊन विद्यार्थिनींच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
यावेळी सायली सुके यांनी महिलांना सक्षम होऊन कर्तृत्व गाजवावे असा संदेश दिला. प्राचार्य किरण पवार यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला दिनाचे औचित्य साधून योग शिक्षिका जयश्री भावेकर यांचे बालसंगोपन व आहार या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जयश्री भावेकर यांनी उपस्थित महिलांना शास्त्र शुद्ध आहार व वाढत्या वयातील पाल्याची जडणघडण होताना घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी काही मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महिलांनी उत्स्पूर्त प्रतिसाद दिला व खेळांचा आनंद लुटला. या कार्यक्रमाच्या वेळी महिला पालक भाग्यश्री भोरडे ,सोनाली खुटवड, प्राची धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या विद्यार्थिनी कुमारी साक्षी खुटवड व दिव्या कोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
महिलांसाठी आयोजित खेळात अवंतिका वाडकर, अंकिता पवार, सुनंदा गंभिरे ,डांगे, रुपाली बागल विजयी झाल्या.
शाळेचे मुख्याध्यापक किर
ण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नम्रता थोरात यांनी केले.