नसरापूर : भोर तालुक्यातील शेतीला आधुनिक आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक व शेतीविषयक फायदा मिळावा, यासाठी करंदी येथे २५ शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस प्रकल्पांचे वाटप करण्यात आले. हा प्रकल्प गावांच्या शाश्वत विकासासाठी आश्वासक ठरत असून, पर्यावरणपूरक उर्जेच्या वापरामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
यावेळी बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. चे संस्थापक अभिमन्यु नागवडे, संचालक गौरव जगताप, प्रतिनिधी गणेश भुजबळ, तसेच भोर येथील बायोगॅस लाभार्थी नवनाथ गायकवाड, शशिकांत गायकवाड, अनिल गायकवाड, विलास गोळे, बाबासाहेब गोळे, उत्तम बोरगे, दीपक बोरगे, ऋषिकेश बोरगे, अंजली साबळे आणि स्थानिक ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
१८५ शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पाचा लाभ
भोर, पुरंदर, राजगड, खेड, आंबेगाव या तालुक्यांतील एकूण १८५ गरजू शेतकऱ्यांना पुण्यातील नामांकित पर्सिस्टंट फाउंडेशनच्या CSR माध्यमातून आधुनिक बायोगॅस संयंत्र देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांकडे २-३ देशी गायी आहेत, त्यांना ४५,००० रुपये किमतीचे बायोगॅस संयंत्र फक्त १०,००० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे संयंत्र २५ वर्ष टिकाऊ असून, शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी मोफत इंधन उपलब्ध होते, त्याचबरोबर खतांवरही मोठी बचत होते.
पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपक्रम
बायोगॅसच्या वापरामुळे शेतकऱ्यांना दरमहा २,००० रुपये इंधन खर्चात बचत होत आहे. तसेच, बायोगॅस स्लरीपासून ४ ते ५ एकर शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत शेतकरी स्वतः तयार करू शकतात, त्यामुळे वर्षाकाठी ७० ते ८० हजार रुपये खतांच्या खर्चात बचत होत आहे. यामुळे या तालुक्यांतील सर्व शेतकरी शाश्वत सेंद्रिय शेतीकडे वळत असून, विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घेत आहेत.
बायोगॅस प्रकल्पामुळे महिलांना दिलासा
एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतीमुळे ग्रामीण भागातील महिलांना अडचणी येत होत्या. मात्र, बायोगॅसमुळे या समस्या सुटल्या असून, धुरामुळे होणारे डोळ्यांचे आजारही टळणार आहेत. तसेच, गावांतील वृक्षतोड थांबून अपारंपरिक ऊर्जेस चालना मिळणार आहे.
या उपक्रमासाठी बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे मोठे योगदान असून, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मश्री, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन तसेच पर्सिस्टंट कंपनीच्या CSR प्रमुख योगिता आपटे आणि वैभव निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
“बायोगॅस संयंत्र बसवल्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो असून, इंधन व खतांच्या खर्चात मोठी बचत होत आहे. पर्यावरणपूरक शेती आणि प्रदूषणमुक्त ऊर्जेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे,” असे समाधान व्यक्त करत लाभार्थी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.