वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे राजगड न्युज
वाई – येथील किसन वीर महाविद्यालयाचा गुणवंत व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थी मयूर रोकडे यास जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्याकडून भरीव आर्थिक मदत देण्यात आली.
मयूर रोकडे हा किसन वीर महाविद्यालयात एम.ए. १ (मराठी) या वर्गात शिकत असून; त्याने विद्यापीठ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उत्तुंग कामगिरी बजावलेली आहे. विविध स्पर्धेत यशस्वी कामगिरी करून किसन वीर महाविद्यालयाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला आहे. त्याच्या या कर्तबगारीचा सन्मान म्हणून २०२२-२३ या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मयूरला जाहीर झाला. हा पुरस्कार पुणे येथे राज्यपालांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असला तरी यापुढेही त्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उंच भरारी घ्यावयाची आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज ओळखून मा. मदनदादा भोसले यांनी पुढाकार घेत प्रथमतः स्वतःच्या रकमेची भर टाकून इतर आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मयूरला ४० हजारांचा मदतनिधी जमा केला त्या सहकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच मयूरला सुपूर्त करण्यात आला.
भोसले व किसन वीर महाविद्यालयाने केलेली ही मदत आणि दाखवलेला विश्वास मी माझ्या खेळाच्या माध्यमातून सार्थ करेन अशी ग्वाही देत मयूर रोकडे यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, संस्थेतील इतर पदाधिकारी, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.