भोर : किराणा मालाच्या दुकानाच्या दरवाजा तोडून दुकानातील ६१ हजार ८०० रुपयांची रोकड व कागदपत्रांची अज्ञात चोरट्याने चोरी केली असल्याची घटना निगुडघर (ता.भोर) येथील वाघजाई प्रोविजन स्टोअर्स नावाच्या दुकानात शनिवारी (ता. २०) रात्री नऊ ते रविवारी (ता.२१) सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत किराणा दुकानदार मनोज बाळासाहेब बांदल (वय ३५, रा.निगुडघर ता.भोर) यांनी रविवारी (ता.२१) भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बांदल यांचे निगुडघर चौकात किराणा मालाचे दुकान आहे. रात्रीचे नऊ नंतर दुकान बंद असताना दुकानाचे मागील बाहेरील दरवाजाचा कडीकोंडा कशाने तरी तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील ४८ हजार रुपयांची रोख रक्कम, एका नायलॉनच्या पांढऱ्या रंगाची पिशवीतील ९ हजार रुपयांची चिल्लर, प्लॅस्टिकच्या गल्ल्यातील २० हजरांची रोख रक्कम, एका काळ्या रंगाची बॅगमधील २३ हजारांची रोख रक्कम तसेच एका खाकी रंगाच्या लेदरच्या पाकीटात असनारे पाच हजार रुपये व चार चाकी वाहनाचे लायसन्स, एस.बी.आयचे ए.टी.एम.कार्ड, पॅन कार्ड ,आधार कार्ड, मतदान कार्ड ,व फिर्यादी यांची पत्नी संपदा हिचे पॅन कार्ड, आधार कार्ड, व फिर्यादी यांचा मुलगा राजवर्धन याचे आधार कार्ड असा एकूण ६१ हजार ८०० रुपयांच्या रक्कमेवर व अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. रविवारी सकाळी ही घटना घडल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यावर पोलिसांना कळविले.
भोर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिर्डोशी बिटचे अंमलदार उद्धव गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.