खंडाळा – क्रांतिज्योती साविञीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव याठिकाणी जलजीवन विहीरीसह विविध मागण्यांकरीता आमरण उपोषणाच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या नायगाव ग्रामस्थांचे उपोषण शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या व सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या यशस्वी शिष्टाईने स्थगित करण्यात आले आहे.यावेळी नायगावच्या सरपंच साधना नेवसे यांच्यासह उपोषणकर्ते ग्रामस्थांना शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव,माजी आमदार मदनदादा भोसले,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी खंडाळा तालुक्यातील नायगावच्या सरपंच साधना नेवसे,उपसरपंच रेश्मा कानडे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती जमदाडे,ग्रामपंचायत सदस्य पुनम नेवसे,ग्रामपंचायत सदस्य गणेश नेवसे,ग्रामपंचायत सदस्य वैभव कांबळे, आदेश जमदाडे,निखिल झगडे दिनांक 21 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाला बसले होते आज उपोषणाचा तिसरा दिवस होता महिला उपोषणकर्त्यांना त्रास होऊ लागल्याने सर्व ग्रामस्थ चिंतित होते उपोषणासाठी गावातील युवक, ग्रामस्थ आणि महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
नायगावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा प्रश्न सोडवण्यासाठी व विविध मागण्यांसाठी नायगावचे ग्रामस्थ उपोषणाला बसत नायगाव ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान,आज गुरुवार दिनांक 23 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा पुरुषोत्तम जाधव, माजी आमदार मदनदादा भोसले,अँड.विनीत पाटील व सातारा जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे यांनी आज नायगाव येथे उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत.याबाबत प्रशासनाकडून लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रशासनस्तरावर नायगावच्या प्रश्नांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नायगाव ग्रामस्थांनी आमरण उपोषण स्थगित केले.यावेळी पुरुषोत्तम जाधव,मदनदादा भोसले,ज्ञानेश्वर खिलारी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या समस्यांवर सात दिवसांमध्ये उपाययोजना करण्याचे प्रशासनाकडून आश्वासन दिल्याने तसेच गेस्ट हाउस च्या कामासाठी निधी कमी पडल्यामुळे काम रखडले होते त्यासाठी निधी देण्यात येईल तसेच पाण्याचे टाकीचे काम उद्यापासून सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आणि सर्वानुमते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चक्के, गटविकास अधिकारी अनिलवाघमारे, नायब तहसीलदार खंडाळा सुरज चंदनशिवे, अनुप सूर्यवंशी, अनिरुद्ध गाढवे, भूषण शिंदे, संभाजी जाधव, अतुल पवार, अलंकार सुतार, सागर ढमाळ आणि नायगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने व शिरवळ पोलीस प्रशासन उपस्थित होते .