शिरवळ (सातारा): शिरवळ पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगदरम्यान पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीसांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरवळ गायचे हददीतील पळशी रोडला दोन संशयित इसम धनलक्ष्मी रेसिडेंटच्या पाकींग आवारात संशयीतरित्या फिरत आहेत.
पोलीसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची शरीराची झडती घेतली. यातून त्यांच्याकडून एक लोखंडी स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस आणि एक मोटारसायकल असा सुमारे 1,20,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानुसार दिपक संतोष पाटणे (वय 22 वर्षे, रा. विंग ता. खंडाळा, जि. सातारा) आणि ओम सतिष कदम (वय 19 वर्षे, रा. लोणी ता. खंडाळा, जि. सातारा यांच्या विरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3(1), 7, 25 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप-निरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहा. पोलीस फौजदार पावरा, पो.हवा. सचिन वीर, जितेन्द्र शिंदे, प्रशांत धुमाळ, पो.कॉ. मंगेश मोझर आणि सुरज चव्हाण यांच्या टीमने ही कारवाई केली.