एकीकडे शासन पटसंख्येच्या अभावी शाळा बंद करत असताना दुसरीकडे मात्र भोर तालुक्यातील दुर्गम भागातील वेळवंड खो-याच्या पांगारी माध्यमिक आश्रम शाळेच्या श्रेयस गणेश कंक या विद्यार्थ्याने आपल्या हुशारीच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर इ ६ वी च्या पात्रता सैनिकी परिक्षेत घवघवीत यश मिळवत सैनिकी शाळेसाठी पात्र ठरत स्वतःची निवड सार्थ केली आहे.
पांगारी (ता.भोर) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेळवंड खोऱ्याच्या दुर्गम भागात असून या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणारा आहे. या शाळेत मुलांच्या प्रगतीसाठी आणि बौद्धिक विकासासाठी या शाळेतील शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात, तसेच पालकांचे सहकार्य मुलांना मोठ्या प्रमाणात लाभत आहे त्याच्या जोरावर या शाळेतील अनेक विद्यार्थी यश संपादन करून बाहेरगावी चांगल्या हुद्द्यावर आहेत. या शाळेचे मुख्याध्यापक प्रा.सोनवणे यांनी श्रेयसची उत्तम तयारी करत वर्गशिक्षक प्रा.आले यांच्या मदतीने मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगारीचे मुख्याध्यापक निलकंठ लोंढे व उपशिक्षक अनिस शेख यांचेही अनमोल मार्गदर्शन लाभले. श्रेयसची सैनिकी शाळेसाठी निवड झाल्याने तालुक्यातुन त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. इयत्ता पाचवीतुन सहावीसाठी सैनिकी शाळेसाठी निवड झालेला श्रेयस हा तालुक्यातील बहुदा पहिलाच विद्यार्थी असल्याचे त्यांचे वडील गणेश कंक कडून सांगण्यात आले. तसेच गेल्या वर्षी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये याच शाळेतील विद्यार्थिनी कु. सई गणेश कंक हिचा नवोदय विद्यालय पुणे (शिरूर) येथे यशस्वी विद्यार्थ्यीनी म्हणून नंबर लागलेला होता ही गौरवास्पद बाब असल्याचे कंक यांनी सांगितले.