पाणंद रस्त्यांच्या नावाखाली वापरला जातोय बेकायदा मुरूम?
संबंधित महसूल कर्मचाऱ्यांचे मुरूम माफिया सोबत अर्थपूर्ण संबंध?
नसरापूर : तालुक्यातील कामथडी येथील खाजगी जागेतील (गट ४५९) डोंगर पोखरून बेकायदा गौण खनिजाचा बेसुमार उपसा व सपाटीकरण होत असून कामथडी येथील सरकारी पाणंद रस्त्यांच्या नावाखाली भागातील कापूरहोळ लक्ष्मी पार्क, कामथडी येथील रोपवाटिका जवळ , नसरापूर वणवीहार सोसायटी , कामथडी येथील पाणंद रस्ता विविध ठिकाणी लाखो ब्रास मुरूम वाहतूक होत आहे. अवैध गौण खनिज वाहतूक ही स्थानिक महसूल कर्मचारी यांच्या संगम मताने चोरी केली जात असून प्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहरांना फोन द्वारे संपर्क करून लक्ष देऊ नये असे सांगितले जात आहे . या कर्मचाऱ्यांचे ऑडियो रेकॉर्डिंग राजगड न्युज लाईव्ह च्या हाती लागले आहे.
गौण खनिज विभागामार्फत माती, मुरूम, दगड, वाळू यांच्या खरेदी- विक्रीवर आकारण्यात येणाऱ्या स्वामीशुल्क द्वारे या विभागाला लाखों रुपयांचा महसुल मिळतो. मात्र, कमथडी हद्दीत दिवसरात्र मुरुमाचे उत्खनन करत चोरट्या पद्धतीने बेसुमार मुरूम उपसा व वाहतूक चालु आहे. मात्र, स्थानिक महसूल कर्मचाऱ्याला हाताशी धरून कामथडी भागा मध्ये मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन जोमात सुरू आहे.
तालुक्यातील हायवे लगत असणाऱ्या परिसरात मुरुममाफियांनी धुडगूस घातला असून मुरूम उत्खननाचा सपाटा चालविला आहे. सपाटीकरणाच्या नावाखाली येथून हजारो ब्रास मुरुमाचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊनही महसूल कर्मचारी धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत. यामुळे मुरूमचोरीला आळा मुरूम उत्खनन व्यवसायाला गती आल्याचे दिसून येत असल्याने याला पाठबळ महसूल विभागाचे असल्याचा परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
मुरूमचोरीचेही प्रस्थ वाढत सर्वत्र पाहावयास मिळत आहे. शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती मुरुमाची बेकायदेशीररीत्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलॅन मशिनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही. याच्या पाठीमागे काय गौडबंगाल आहे, याचं गणित सामान्य माणसाला उलगडत नाही.
शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे. महसूल प्रशासनाने रॉयल्टीधारकांनी दिलेल्या नियोजित जागेवर जाऊन परवानगी आणि प्रत्यक्ष केलेले उत्खनन यांची चौकशी करून कारवाई केल्यास रॉयल्टीच्या नावावर मोठे घबाड उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तालुक्यात व भागात असलेल्या इतर गौण खनिज बाबत देखील हेच असल्या बाबत शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्या महसूल विभाग कर्मचाऱ्यांचे ऑडियो रेकॉर्डिंग राजगड न्युज लाईव्ह हाती..
कामथडी येथील सुरू असलेला अवैध मुरूम उत्खनन या बाबत माहिती घेत असताना सदर ठिकाणी माहिती घेऊ नये व सुरू असलेल्या कामाकडे दुर्लक्ष करण्यासाठी महसूल विभागाच्या त्या कर्मचाऱ्यांचे संभाषणाचे ऑडीओ क्लिप ही मिळाली असून त्यामध्ये तो कर्मचारी म्हणत आहे की , सुरू असलेले काम हे पाणंद रस्ते साठी मुरूम नेला जात असून त्या कडे आपण लक्ष देऊ नये तसेच ते सरकारी काम असून त्याची सीमाशुल्क सरकार भरून घेत असते. परंतु सदर ठिकाणचा मुरूम हा पाणंद रस्त्यांच्या नावाखाली भागातील कापूरहोळ लक्ष्मी पार्क, कामथडी येथील रोपवाटिका जवळ , नसरापूर वणवीहार सोसायटी , कामथडी येथील पाणंद रस्ता विविध ठिकाणी लाखो ब्रास मुरूम वाहतूक होत आहे. तर यासाठी कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी देण्यात आलेली नाही.
दिवसरात्र धुमाकुळ सुरू…महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग
गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्यांचा असा दिवसरात्र धुमाकुळ सुरू आहे. तालुक्यातील गौण खनिज व्यावसायिक आणि महसूल विभागाचे संबध जिव्हाळ्याचे असल्याचे दिसत असल्याने तालुक्यात कोणत्याही ठिकाणी उत्खनन करण्यासाठी या खात्याकडून कायम हिरवा कंदील दिला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मुरूम माफियांवर कारवाई होणार का?
दरम्यान काही मुरूम माफिया अरेरावीची भाषा ग्रामस्थांना करत आहे. तसेच महसूल खिशात घेऊन फिरतो असे मुरूम माफिया सर्वत्र सांगत आहे. यामुळे संबंधित मुरूम माफियांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करणार का? असा सवाल आता नागरिक करीत आहेत.
याबाबत संबंधित साजाचे तलाठी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. परंतु विभाचे मंडळ अधिकारी यांनी माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती राजगड न्युज लाईव्हशी बोलताना दिली.
क्रमशः