राजगड, 10 जून: राजगड तालुक्यातील करंजावणे (ता.राजगड) येथील शेतकरी राजू मनोहर शिंदे यांच्या दोन म्हशींना रविवारी (9 जून) सायंकाळी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे दोन लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे गुंजवणी नदी शेजारून मार्गासनी कडे जाणाऱ्या कृषी पंपच्या विद्युत लाइनवर झाड पडल्याने हा अपघात घडला. शेतकरी राजू शिंदे हे जनावरांना पाणी पाजल्यानंतर घराकडे घेऊन जात असताना दोन म्हशी विद्युत तारा तुटून खाली पडलेल्या विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्या. यात दोन्ही म्हशींचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, शिंदे यांना विद्युत शॉक बसला मात्र ते किंचित जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरातील विद्युत पुरवठा बंद केला.
महावितरणचे शाखा अभियंता विठ्ठल भरेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी उपसरपंच आनंद शिंदे, सुरेश शिंदे, प्रशांत शिंदे, विशाल शिंदे आदी उपस्थित होते.
भरेकर यांनी या घटनेची चौकशी सुरू असून पीडित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे सांगितले.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे यांनी शेतकऱ्यांना विनंती केली आहे की, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि मान्सूनमुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब वाकले आहेत आणि तारा तुटल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः आणि जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, वाकलेले विद्युत खांब आणि तुटलेल्या तारा दिसल्यास तात्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.