दत्तात्रय कोंडे
खेड शिवापूर::तालुक्यातील रांझे येथील “टफ कोट पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीला बुधवारी (दि. २७ मार्च) सकाळी १०:१५ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
या कंपनीमध्ये २७ कामगार काम करत असताना अचानक पेंटच्या बॅलरला आग लागली. काही क्षणातच या आगीने अचानक भीषण रूप धारण केले. या कंपनीच्या बाजूला असणारी कंपनी “एस्कोपेंट प्रायव्हेट लिमिटेड” या कंपनीला देखील आग लागली.
स्थानिकांनी पोलीस स्टेशन आणि डायल ११२ यांना या घटनेची माहिती दिली. राजगड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन भोर फायर स्टेशन, कात्रज फायर स्टेशन आणि नांदेड सिटी (pmrd) या फायर स्टेशनला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.
कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्या कारणाने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले होते. सदर आगीच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या आगीमध्ये कंपनीमधील लाखो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी राजगड पोलीस अधिक तपास करत आहेत.
अनेक वर्षापासून आग लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने राजगड पोलिसांनी सर्व कंपनी चालकांची एक मीटिंग घेऊन सर्वांमध्ये एक आगीचा बंब घ्यावा अशा आदेश किंबहुना सूचना दिल्या होत्या मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे या घटनेवरून एका स्पष्ट होत आहे.