पुणे : शिक्षणाचा अधिकार वाडी-वस्तीवरील मुलापर्यंत पोहोचला पाहिजे, तसेच प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात शेवटपर्यंत टिकले पाहिजे यासाठी भौगोलिक क्षेत्र लक्षात घेऊन सरकारने अतिदुर्गम भागातील वाड्या, वस्त्यांमध्येही शाळा काढल्या. मात्र, आजही शिक्षणाची ही गंगा तळागाळातील घटकापर्यंत झिरपलेली नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा आजही पटसंख्येअभावी बंद पडताना दिसत आहेत. काही शाळा एक किंवा दोन विद्यार्थ्यांसाठी देखील भरत आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने ‘समूह शाळा’ योजनेचा निर्णय घेतला आहे. कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता समूह शाळेत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ‘गाव तिथे शाळा’ ही संकल्पनाच बारगळेल, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून नंदूरबार येथील तोरणमाळ आणि पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन्ही ठिकाणी समूह शाळांचा उपक्रम राबविण्यात आला. त्याप्रमाणे इतर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील छोट्या शाळा, (Pune news) विशेषत: कमी पटाच्या शाळा जोडण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा आदेश देण्यात आला. त्यानुसार कार्यवाहीची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.