शिरवळ : पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता.खंडाळा) येथील अक्षय लॉन्स मंगल कार्यालय येथे लग्न समारंभासाठी असलेल्या स्टेजवर मागे असणारी भिंत आणि लोखंडी होर्डिंग कोसळून आज सोमवारी(दि. 13 मे) रोजी मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटने मध्ये वधु-वरांसहित अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल येथे तातडीने नेण्यात आले आहे, त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कामथडी(ता.भोर) येथील प्रणव साहेबराव वाल्हेकर आणि राजापूर(ता.भोर) येथील पायल रामभाऊ खुटवड यांचा विवाह सोहळा पुणे-सातारा महामार्गावरील अक्षय लॉन्स मंगल कार्यालय(शिंदेवाडी, ता.खंडाळा) येथे आज सोमवारी 6 वाजून 15 मि. आयोजित केला होता. लग्न समारंभ उरकल्यानंतर वधु-वरांना शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक,मित्रमंडळी स्टेज वर येत होते. आणि इतक्यातच होत्याचे नव्हते झाले.
स्टेजच्या पाठीमागे असणारी 10 ते 12 फूट विटांमध्ये बांधलेली भिंत लोखंडी होर्डिंग सहीत स्टेज वर कोसळली. या घटनेने कार्यालयातील उपस्थितांची एकच धांदल उडाली. लग्न समारंभात उपस्थित असलेल्या सर्वांनी लगेचच स्टेज कडे धाव घेत भिंत बाजूला करण्यास सुरुवात केली. प्रत्येक जण स्टेज वरील एक एक वीट बाजूला करताना दिसत होता. परंतु सुदैवाने भिंती खाली अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. वधु-वरांसहित अनेक जण या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारा करिता शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. यावेळी काही महिला तर हे दृश्य पाहून जागीच चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या असल्याचे दिसून आले.
घडलेल्या घटनेची माहिती घेतली असून या दुर्घटनेशी संबंधित असणाऱ्या दोषींवर लवकरच कारवाई करणार- अजित पाटील, तहसीलदार खंडाळा
कार्यालय प्रशासनाच्या हलगर्जीपणने घटना?
शिरवळ येथील असलेल्या अक्षय लॉन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होत असतात आणि याच ठिकाणी कार्यालयात बाहेरील बाजूस विटांची भिंत व स्टेज टाकण्यात आलेले आहे आणि याचे काम निकृष्ट दर्जाचे केले असून वऱ्हाडी मंडळींच्या जीवाशी खेळ या कार्यालय चालकांकडून केला जात आहे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.