भोर :लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असून राजकीय नेते प्रचार सभा घेत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाश शिंदे भोरमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पोहोचले. आपल्या सरकारने महिलांचा सन्मान वाढवणारे अनेक निर्णय घेतले.
एसटीमध्ये 50 टक्के सवलत, महिलांना स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट, केंद्राची लखपती दीदी, उज्वल्ला योजना, जनधन योजना अशा योजना सुरु केल्या. आजपासून माता भगिनींशीसंबधित एका ऐतिहासिक निर्णयाची राज्यात अंमलबजावणी सुरु झाली. शासकीय कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावात आधी आईचे नाव नंतर वडीलांचे नाव लावले जाणार आहे. आपले सरकार मुलगी, सून, पत्नी असा कोणताही भेदभाव करत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. भोर येथे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
ही निवडणूक नात्यागोत्याची किंवा परिवारवादाची नाही. ही निवडणूक विकासाची आहे. ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे. ही निवडणूक मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची आहे, असे ते म्हणाले. काही लोक निवडणुकीला परिवारवादाचा रंग देण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझा प्रत्येक मिनिट राज्याच्या विकासासाठी समर्पित आहे. मी गावी हेलिकॉप्टरने जातो, तिथे शेती करतो त्यावर टीका होते. पण शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे अजूनही पचनी पडलेले नाही, त्यांना पोटदुखी झाल्याने असे बेछूट आरोप केले जातात, अशी टीका त्यांनी उबाठावर केली.
भोरची जनता सूज्ञ आहे. त्यामुळे महिला भगिनींचा सन्मान करणाऱ्या महायुतीलाच मतदान करेल. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींनी जे काम केले ते 60 वर्षांमध्ये झाले नाही. जरा गरम झाले की परदेशात पळणारे लोक देशाची काय प्रगती करणार, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.
आपले सरकार येण्यापूर्वी राज्यात नकारात्मकता होती. सण उत्सवांवर बंदी होती. मेट्रो कारशेड, समृद्धी हायवे अशा मोठ्या प्रकल्पांना रोखले होते. आम्ही उठाव केला. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार घेऊन सर्वसामन्यांना न्याय देणारे सरकार स्थापन केले. आज उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती मिळत आहे. महायुतीचे सरकार तरुणांच्या हाताला रोजगार देणारे आहे.
मुंबई-पुणे हायवे बाळासाहेबांच्या संकल्पनेतून झाला. केवळ अडीच तासात मुंबईतला माणूस पुण्यात पुण्यातला माणूस मुंबईत जातो. हिंजवडी सारख्या भागांमध्ये आयटी पार्क झाले. ऑटोमोबाइल इंडस्ट्री आली, सर्विस इंडस्ट्री, रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी दिसून आली. एक रस्ता काय करु शकतो हे मुंबई-पुणे एक्सप्रेसने दाखवून दिले. आपण त्यात एक मिसिंग लिंक करतोय. पुणे रिंग रोड करतोय, यात शेतकऱ्यांना कुठलीही अडचण असेल तर ती सोडवायला 24 तास काम करणारे सरकार बसले आहे, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समजाला आरक्षण दिले. ते हायकोर्टामध्ये टिकले परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये अरक्षण रद्द झाले. आपले सरकार जे होणार असेल तेच बोलणारे आहे, जे होणार नाही ते बोलणार नाही. खोटी आश्वासन आपण कधी दिली नाही आणि देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आताही मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हायकोर्टाने आक्षेपाची याचिका फेटाळली. पुढे कोर्टात हे आरक्षण टीकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.