कुंदन झांजले|राजगड न्युज
ग्रामीण भागात गावा -गावातुन घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत दुर्गामाता दौड.
भोर : सध्या तालुक्यात घटस्थापना होऊन,शारदीय नवरात्रौत्सव सुरू झाला असुन सर्वत्र गावा गावातुन, खेड्यापाड्यात,वाडी वस्तीवर पहाटेच्या पहरी सुर्योदयापुर्वी व सायंकाळी सुर्यास्तानंतर श्री दुर्गामाता दौडने देवीचा जागर करून जागर देशभक्तीचा व गोंधळ राष्ट्रभक्तीचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भोर विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व धारकरी,शिवपाईक व सेवेकरी यांच्यावतीने साजरा केला जात आहे.
या दुर्गामाता दौड मध्ये गावातील ज्या ठिकाणी देवाची स्थापना असेल अशा ठिकाणी गावातील सर्व तरुण तरुणी, लहान मुले सामुहिकपणे एकत्र जमून डोक्यावर पांढरी, केशरी रंगाची टोपी,फेटा बांधून एका रांगेत उभे राहून प्रथम सुरूवातीस एका धारक-याच्या हातात हिंदूधर्म प्रतिक भगवा ध्वज घेऊन,पूजा करून प्रेरणा मंत्र म्हणत, ध्वजाच्या पाठीमागे एका रांगेत जगदंबा ,आई भवानी, दुर्गामाता ,श्री शिवरायांचा, श्री संभाजी महाराजांचा, हिंदू धर्माचा जयजयकार करत शिवहृदयश्लोक,प्रेरणामंत्र , ध्येयमंत्र, गणेशाची, देवीची आरती, वंदे मातरम्, महाराष्ट्रगीत गात संपूर्ण गावातून ही दौड काढली जात आहे.
ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ,शिवछत्रपती शिवराय व संभाजी महाराजांनी हिंदू धर्म संस्कृती, समाज,देव, देश धर्म रक्षणासाठी अखंडपणे दौडत शत्रुंशी लढत ,झगडून आपल्या रक्तातील आग, रग,धग,लढाऊपणाने हिंदू धर्म समाजाचे रक्षण केले हाच रक्तातील आग,रग,धग, लढाऊपणा आजच्या विज्ञानयुगातील तरुणांच्या रक्तात येणे आवश्यक आहे म्हणून या नवरात्रौत्सवात देवी दुर्गामातेचा आशिर्वाद घेत हि दुर्गामाता दौड सर्वत्र सूरू आहे. तालूक्यात वीस खो-यातील गावे, वेळवंड- महुडे , चाळीस गाव खो-यातील गावे हायवे पट्ट्यातील गावे वाडी वस्त्यांमध्ये ही दुर्गामाता दौड नियमित सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यातील सर्व गावांची दुर्गामाता महादौड विजयादशमी दस-यादिवशी भोरमधील चौपाटी शिवतीर्थ चौपाटी पासून भोलावडेत यांची सांगता होणार आहे . सध्या वेळवंड खो-यातील प्रत्येक गावांमध्ये आजूबाजूची गावे मिळुन दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. यामध्ये गावातील तरुण, तरूणींसह लहान मुले महिला- पुरुष मोठ्या उत्साहाने दौडमध्ये सहभागी होत आहेत.