कापुरव्होळ येथे पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा संपन्न
नसरापूर : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे वारे वाहू लागले आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता . यावेळी सर्वानुमते विधानसभेला बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भोर विधानसभेतून उमेदवार देणार असल्याची घोषणा करण्यात आली.तर भोर विधानसभेवर भगवा फडकविनारच असा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापूरहोळ (ता. भोर) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २३ जून) पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना तालुका प्रमुख माऊली शिंदे म्हणाले, निष्ठावान शिवसैनिकांनी ज्या प्रमाणे आघाडी धर्म पालन करत लोकसभा निवडणुकीत खा. सुप्रिया सुळे यांना चांगले मताधिक्य दिले. त्याच प्रमाणे विधानसभेत शिवसेनेच्या मशाली बरोबर ठाम राहतील याचा मला विश्वास आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले,तालुक्यातील काही पदाधिकारी पक्ष सोडून गेले तरी कडवा शिवसैनिक कोठेही गेला नाही. हे लोकसभा निवडणुकीने दाखवुन दिले आहे. या पुढील काळात पक्ष पुन्हा जोमाने बांधुन सर्व निवडणुका लढवायच्या आहेत. त्यासाठी आपण सर्व कामास लागु असे अवाहन त्यांनी केले.
दरम्यान, पुढे बोलताना युवासेना जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे म्हणाले की, भोर विधानसभा मध्ये शिवसेनेचा आमदार होऊ शकतो. आतापर्यंत पक्ष श्रेष्ठींचा कुठलाही आदेश तालुकाप्रमुखांना आलेला नाही त्यामुळे शिवसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागले पाहिजे. भोर तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्याकडे शिवसैनिकांनी लक्ष दिले पाहिजे सध्या महावितरणाचा प्रश्न आहे, भोर कापूरहोळ रस्त्याचे काम बाकी आहे त्याचा प्रश्न आहे.
तसेच पुढे बोलताना बोरगे म्हणाले, जे गेले त्या बद्दल वारंवार बोलुन उपयोग नाही, चाळीस आमदार व तेरा खासदार जाऊन सुध्दा उध्दवसाहेब ठाकरे डगमगले नाहीत. आपल्या मधुन कोणी गेले याचा विचार न करता निष्ठावंतांच्या जीवावर शिवसेनेची ताकद वाढवुया. भोर विधानसभा शिवसेना लढणार व विजयी देखिल होणार हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भोर तालुका महिला संघटीका निशाताई सपकाळ यांनी तालुक्यातील महिला शिवसैनिक देखिल या पुढील लढ्यात मागे राहणार नाहीत अशी ग्वाही दिली.
या मेळाव्या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे, जिल्हासचिव रोहीदास कोंडे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, माजी तालुकाप्रमुख पोपटकाका जगताप, युवासेना तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे, तालुका महिला संघटिका निशाताई सपकाळ, तालुका उपसंघटिका प्रिया मांढरे,भोर तालुका समन्वयक भरत साळुंके, महिला आघाडीच्या रुपाली पडवळ, योगेश महाडिक, शिवआरोग्य सेनेचे तालुका समन्वयक शरद जाधव, प्रसिध्दी प्रमुख नितेश चव्हाण, कापुरव्होळेच माजी सरपंच योगेश गाडे, ओंकार झांजले, चांगदेव आवाळे, श्रीकांत लिमण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे सुत्रसंचालन शरद जाधव यांनी केले तर भरत साळुंखे यांनी आभार मानले.