आषाढी एकादशीनिमीत्त पंढरपूरच्या वारीचे दर्शन,टाळ मृदुंगाच्या गजरात विठु नामाचा गजर
नसरापूर : नवसह्याद्री गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेज, नायगाव या शाळेचे विद्यार्थी व बाल वारकरी यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून टाळ, मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष करत चेलाडी ते नसरापूर दिंडीद्वारे पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा संदेश दिला.
आषाढी एकादशी निमित्त पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, यात विद्यार्थी तसेच शिक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते. नवसह्याद्री ग्रुप ऑफ इंस्टिट्युट चे संस्थापक पोपटराव सुके तसेच संचालिका सानवी सुके यांच्या हस्ते पालखीचे विधीवत पूजन करून हरिनामाचा तसेच टाळ – मृदुंगाचा गजर करीत दिंडीचे प्रस्थान झाले. इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने सहभाग घेतला.
विठ्ठल – रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई या संतांच्या वेशभूषा करत, पालखीचे प्रस्थान करताना विद्यार्थ्यांनी घोषणा देत समाजामध्ये संस्कृती भक्ती, शिक्षण तसेच पर्यावरणाचे रक्षण याचा संदेश दिला. तसेच भारुड, अभंग, विठ्ठल नामाचा जयघोष, फुगड्या विविध कार्यक्रम करत विद्यार्थ्यांनी पालखीचे रिंगण तयार केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपाली शिंदे आणि कलाशिक्षक महेश्वर जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले.