भोर वरून वेळवंड खोऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांना घेऊन जाणारी मुक्कामी भोर -शिळीम-साळुंगण एसटी बस पांगारीजवळ असणाऱ्या आश्रम शाळेच्या रस्त्याच्या कडेला खचल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही हानी झाली नाही व सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भोर वरून शिळीमला जाण्यासाठी मुक्कामी एसटी बस निघाली. या एसटीमध्ये अंदाजे पंचवीस ते तीस प्रवासी होते. सध्या या भागात पाऊस असल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईट पट्ट्या खचल्या आहेत. पांगारी जवळच्या आश्रम शाळेजवळ ही बस गेली असता रस्त्याच्या कडेची साईट पट्टी खचल्याने मोठ्या प्रमाणात हि बस खचली. एसटी बस रुतल्याचे समजताच वाहक चालक यांनी व प्रवाशांनी प्रसंगावधान राखून एसटीच्या बाहेर उतरले .या गाडीतील सांगवी गावचे प्रवासी बाळू जाधव यांनी घडलेली घटना या भागचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठल आवाळे यांना सांगितली, विठ्ठल आवळे यांनी त्वरित फोन द्वारे पांगारी गावचे मा सरपंच गणेश कंक यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले गणेश कंक यांनी आपले बंधू रवी कंक यांना आपली पिकअप गाडी घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप घरी सोडण्यासाठी सांगितले. त्यांच्यासोबत सुरेश कंक हे ग्रामस्थ होते. पांगारी पासून वर जाणाऱ्या गावातील सुमारे २५ प्रवासी यामध्ये होते. यामध्ये काही सांगवी गावचे पांगारीजवळ आश्रम शाळेतील विद्यार्थी देखील होते. साळूंगण राजीवडी, कोंडगाव, सांगवी ,कुंड, शिळीम अशा गावातील प्रवासी या बस मध्ये होते. पांगारी गावचे ग्रामस्थ गणेश कंक, रवी कंक, सुरेश कंक व जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवळे यांनी दाखवलेल्या सहकार्यामुळे एसटीतील प्रवासी रात्रीच्या वेळी सुखरूप घरी पोहोचले. बसमधील प्रवाशांनी रवि कंक याचे आभार मानले.