भोर: भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडील प्राप्त निर्देशान्वये, जिल्हाधिकारी डॉ .राजेश देशमुख सो यांचे मार्गदर्शनाखाली विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून 203 भोर मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये येत्या दिनांक 7 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
मागील आठवड्यात म्हणजेच 27 ऑक्टोबर 2023 रोजी मतदासंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादी मध्ये ज्यांची नावे आलेली माहित त्यांना 9 डिसेंबर पर्यंत हरकती तसेच नाव नोंदणी करण्याची संधी आहे. याचाच भाग म्हणून मतदार संघातील सर्व यादी भागात विशेष ग्राम सभेने आयोजन केले असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोर श्री. राजेंद्र कचरे यांनी दिली आहे.
सदर ग्रामसभा ही मतदार नोंदणी त्याचबरोबर नावात दुरुस्ती वगळणी व आधार जोडणी साठी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर ग्रामसभेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल
१) सद्यस्थितीत सदर गावात असलेली मतदार यादी ग्रामसभेतील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी ,तपासण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच या यादीचे ग्रामसभेमध्ये जाहीर वाचन करण्यात येणार आहे.
२) गावातील सर्व नागरिकांना मतदार यादीतील नोंदी तपासून घेण्यासाठी सांगण्यात येणार आहे. जर मतदार असतील त्यांची यादी तयार करण्यात येऊन
सदर यादी प्रमाणित करून येणार त्यांची नावे कमी करण्यासाठी अहवाल पाठविण्यात येणार आहे.
३) दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीवर कोणाची हरकती असल्यास किंवा कोणाला सदर नोंदीमध्ये दुरुस्ती करायची असल्यास किंवा ज्या पात्र नागरिकांचे नाव सदर मतदार यादीत नसेल अशांना नव्याने नाव नोंदणी करायची असल्यास अशांना ग्रामसभेमध्येच फॉर्म भरून घेण्याची तसवीस करण्यात आलेली आहे सदर फॉर्म्स हे त्या ठिकाणी उपलब्ध असतील. तसेच ज्या मतदारांना दिनांक एक जानेवारी 2024 रोजी अठरा वर्षे पूर्ण होत असतील त्यांना नवीन मतदार नोंदणीसाठी आगाव अर्ज देखील त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने करावयाची नाव नोंदणी बाबत देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
४) दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एरो नेट प्रणालीवर चिन्हांकित करण्यात येणार आहे जेणेकरून प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात त्यांना वेगवेगळ्या सुविधा देता येतील.
५) सदर कालावधीत प्राप्त होणारे हरकती अर्ज ,दुरुस्ती व वेगवेगळ्या नोंदणीच्या अर्जाची संकलन करून ग्रामपंचायत कार्यालयाने संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे तो अहवाल पाठवून त्यावर मतदार नोंदणी अधिकारी उचित कारवाई करणार आहेत.
६) ग्रामसभेमध्ये स्वतः मतदार नोंदणी अधिकारी ,तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी ,तलाठी ,बी एल ओ पर्यवेक्षक ,तसेच स्वतः बी एल ओ व नामनिर्देशित क्षेत्रीय अधिकारी यांचे सह ग्रामविकास विभागाचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी , ग्रामसेवक हे उपस्थित राहणार आहेत.
७) यावर्षीची प्रारूप मतदार यादी 27 ऑक्टोबर 2023 ला प्रसिद्ध झालेली आहे .सदर यादीमध्ये ज्या व्यक्तींची नावे नाहीत त्यांनी 9 डिसेंबर पर्यंत हरकती किंवा नवीन नाव नोंदणी करून घ्यावी जेणेकरून पुढील वर्षी 5 जानेवारी 2024 ला सदर यादी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
अंतिम रित्या प्रसिद्ध झालेली यादी हीच पुढील वर्षी होणारे विविध निवडणुकांसाठी वापरले जाणार असल्याने ती महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र मतदार महाविद्यालयीन युवक युवती ,नव्याने लग्न होऊन आलेल्या महिला भगिनी व विविध भागात नाव नोंदणी न केलेले नागरिक यांना विनंती आहे की सदर कालावधीत जास्तीत जास्त मतदारांनी नाव नोंदणी करून प्रशासनास प्रतिसाद द्यावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी भोर राजेंद्र कचरे, तहसीलदार भोर सचिन पाटील, तहसीलदार वेल्हा दिनेश पारगे, तहसीलदार मुळशी रणजित भोसले यांनी केले आहे .
याबाबत सोमवारी राजकीय पक्षांची बैठक देखील आयोजित करण्यात आलेली आहे. यात राजकीय पक्षांनी त्यांचे पक्षाचे यादी भाग प्रतिनिधि (BLA) यांचे यादीसह उपस्थित राहण्याचे कळविण्यात आलेले आहे.